मुंबई | शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी मुंबई विद्यापीठाची (Mumbai University) जागा देण्याच्या निर्णयाला विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. त्याविरोधात युवासेना आता राज्यपालांकडे तक्रार करणार असून राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना आणि छात्र भारती संघटनेनेही त्याला विरोध केला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात येणारी चित्रनगरी मैदान, नॅनो सायन्स जवळील मोकळी जागा, कुलगुरू निवासस्थानासमोरील मोकळी जागा ही दसरा मेळाव्याच्या वाहनतळसाठी देण्यात येणार आहे. या बातमीनंतर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत आणि या वाहनतळाच्या व्यवस्थेला विरोध करून निषेध व्यक्त केला जात आहे.
शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदाच्या वर्षी बीकेसी मैदानावर होत आहे. दसरा मेळाव्यासाठी हजारो लाखोच्या संख्येने शिंदे गटाचे कार्यकर्ते हे बीकेसी मैदानावर येणार आहेत. दसरा मेळाव्याला येणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांच्या वाहनतळाची सोय मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये केल्याने मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
मुंबई विद्यापीठाची जागा एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाच्या पार्किंगसाठी वापरली जात असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस सह इतर विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. तर युवासेना ठाकरे गट राज्यपालांकडे या संदर्भात तक्रार करणार आहे. मुंबई विद्यापीठाची जागा शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्किंगसाठी दिली जात आहे याचा विरोध आम्ही करतो सर्व प्रभारी अधिकारी असल्यामुळे राजकीय दबाव पोटी हे होत आहे असं युवासेनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
याबाबत छात्र भारतीते मुंबई अध्यक्ष रोहित ढाले म्हणाले की, “मुंबई विद्यापीठाच्या सर्व मोकळ्या जागेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यासाठी जे वाहन येणार आहेत, त्याच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळाली. जवळपास 30 जेसीबी लावून गवत साफ करण्याचे काम सुरू आहे. याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करून सुद्धा हे काम होत नव्हतं. ते काम आता केले जातं आहे आणि विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाच्या जागेवर अशा प्रकारे राजकीय पक्षाची पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. या सगळ्याचा छात्र भारती निषेध करत आहे.”