फुलगाव | काळाच्या ओघात आपण आपली संस्कृती विसरून चाललो आहोत. समाजाची संस्कृती बिघडली की विकृती येते आणि विकृती आलेल्या समाजाला किंवा घराला कोणीच स्वीकृती देत नाही. घराला घरपण देणारी माणसं म्हणजेच घरातील ज्येष्ठ लोक. आपल्या घरातील आजी-आजोबा… ज्या घरातील आजी-आजोबा हसरे व बोलके ते घर सर्वात श्रीमंत घर समजावे. या आजी-आजोबांचा नवीन पिढीला आदर वाटावा व तसे संस्कार बालमनावर व्हावे या हेतूने नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव ‘ज्येष्ठ नागरिक दिना’निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील निवासी विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांना बोलावून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला.
शाळेत आलेल्या आजी-आजोबांचे त्यांच्या नातवांनी ‘पाद्यपूजन’ केले. हे पाद्यपूजन होत असताना आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर समाधानाच्या भावना दिसून येत होत्या. काही आजी-आजोबांना तर, आपले अश्रू अनावर झाले.
आमच्या आधाराची काठी अधिकच बळकट झाली आता आम्हाला भविष्याची चिंता नाही अशा शब्दात पालकांनी व आजी-आजोबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे संयोजन नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर यांनी केले. तर साधना शिंदे, रेश्मा मांढरे, प्रियांका अग्रवाल, सविता दहिफळे, शैलेश घोंगडे, सोमनाथ अवचर, शंकर साळुंखे, दिनेश आत्राम, विकास तिरखुंडे, रणजीत देशमुख इत्यादी शिक्षकांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग जगताप यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.