मुंबई | एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने ३०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या पगारासाठी ३६० कोटी रुपयांच्या निधीची गरज भासते. पण राज्य सरकारने ३०० कोटी रुपयांचीच मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीवरुन , जेवढी मागणी केली तेवढा निधी सरकारने द्यावा, अन्यथा सरकारविरोधात पुन्हा संघर्ष उभा करावा लागेल असा इशारा महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे एसटी कर्मचारी शिंदे सरकारवर नाराज झाल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या होत्या.
दर महिन्याला एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३६० कोटी रुपये लागतात. परंतु तीन महिन्यामध्ये शिंदे सरकारकडून फक्त ६०० कोटी रुपयांची रक्कमच राज्य सरकारने एसटी महामंडळाला दिला असल्याची माहिती बरगे यांनी दिली आहे. एसटी महामंडळाकडून ७३८ कोटी रुपयांची मागणी केली होती. आता फक्त ३०० कोटी रुपयेच देण्यात आले आहेत.असा खुलासा देखील बरगे यांनी केला आहे.