नाशिक | अयोध्येतील राम मंदिर पॉप्युल फ्रंड ऑफ इंडिया अर्थात PFI च्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ATS च्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. अयोध्येतील राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशिद उभारण्याचा PFI चा डाव होता. मात्र NIA, ATS आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणांनी मागच्या महिन्यात देशभरात एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करून PFI च्या मुसक्या आवळल्याने मोठा घातपात टळला आहे.
अयोध्येतील राम मंदिर पुन्हा एकदा दहशतवादी संघटनांच्या रडारवर असल्याचं समोर आलंय. देशविघातक कारवाया आणि सामाजिक अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात PFI च्या अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. PFI च्या मॉड्युलमध्ये २०४७ पर्यंत भारत देश संपूर्ण मुस्लीम राष्ट्र बनवण्यासह बाबरी मशिदीच्या जागी उभारण्यात येणारं राममंदिर पाडून पुन्हा तेथे मशिद उभारण्याचा डाव होता, असं चौकशीत समोर आलं आहे. अटकेत असलेल्या संशयितांनी परदेशात वास्तव्य केल्याचंही तपासात समोर आल्याची माहिती ATS ने न्यायालयात दिली आहे.
बंदी घातलेल्या ‘सीमी’च्या धर्तीवरच कामकाजाची पद्धत असलेल्या PFI वर २३ सप्टेंबरला देशभरात छापेमारी करण्यात आली. तर राज्यातील मालेगाव, पुणे, बीड आणि कोल्हापुरातून ५ जणांना अटक करण्यात आली होती. ATS ने अटक केलेल्या PFI च्या संशयितांपैकी अनेक जणांनी परदेश दौरे केले असून तिथं वास्तव्यही केलंय. त्यामुळे या संघटनेला परदेशातून मोठा आर्थिक फंड मिळत असावा अथवा संशयितांमध्येही आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे.