पुणे | पुण्यात नव्याने सामाविष्ट करण्यात आलेली 34 गावं ही वगळण्यात येणार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तर ही गावे वगळ्याचा डाव शिंदे-भाजप सरकारने केल्याचाही आरोप ही राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी हा गंभीर आरोप केला आहे.
मागील सात महिन्यांपासून पुणे महापालिकेसह राज्यातील 23 महापालिकांवर प्रशासन राज्य आहे. कुठलीही महापालिका लोकप्रतिनिधी शिवाय कारभार करू शकत नाही. असं असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये काही याचिका प्रलंबित आहेत आणि निवडणुका त्वरित घेण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. तर याउलट आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी महापालिकाच्या निवडणुका या चार सदस्य प्रभाग रचनेनुसार व्हाव्यात यासाठी भाजप आणि देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. त्यातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सातत्याने निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र जनतेची कामे मार्गे लागण्यासाठी निवडणुका कशाही घ्या पण त्वरित घ्या ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे, असं प्रशांत जगताप यांनी सांगितले.
शिंदे-फडणवीसांकडून नवी खेळी
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेली 34 गावे वगळण्यात यावीत म्हणजे जेणेकरून 2017चीच प्रभाग रचना कायम राहील यासाठी ही नवी खेळी खेळली जात असल्याचा गंभीर आरोप प्रशांत जगताप यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर केला आहे. भाजपच्या या राजकीय खेळीला राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाम विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आम्ही ही बाब आणणार आहोत, असेही ते म्हणाले.