पुणे | शहरातील वाहतुकीची कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांची अतिरिक्त कुमक तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी दिल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.
मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपच्या शिष्टमंडळाने आज पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उद्देशाने चर्चा केली. सरचिटणीस दत्ता खाडे, संदीप लोणकर, प्रसिद्धी प्रमुख हेमंत लेले, पुष्कर तुळजापुरकर, अरविंद गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुळीक म्हणाले, “शहरातील सर्व चौकांचे स्वतंत्र संस्थेमार्फत सर्वेक्षण करावे. ज्या चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होते, त्याची कारणे शोधावीत आणि त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली होती. त्याला आयुक्तांनी तत्वतः मान्यता दिली.”
मुळीक पुढे म्हणाले, “पुढील काळात रस्त्यांवर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणार नसल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. अशा कारवाईमुळे सर्वांच्याच वेळेचा अपव्यय होतो. वाहतुकीची कोंडी निर्माण होते. पोलिस प्रशासनाच्या वतीने शंभर संगणक खरेदी करून वाहनचालकांना ई-चलन पाठविण्याची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे उपलब्ध होणार्या अतिरिक्त पोलिसांचा उपयोग वाहतूक नियंत्रणासाठी केला जाणार आहे. तसेच 400 वॉर्डनची नियुक्ती करण्यात येणार आहे.”
उपाययोजनांसाठी उच्चस्तरीय बैठक
शहरातील वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत वाहतूक पोलिस विभाग, पुणे महापालिका, मेट्रो, सार्वजनिक रस्ते विभाग, राज्य परिवहन मंडळ, पुणे महानगर परिवहन महामंडळ, स्मार्ट सिटी अशा सर्व महत्त्वाच्या विभागांची एकत्रित उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी एक-दोन दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.