पुणे | आपले देशी खेळ आणि खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी भरीव काम केले आहे. खेळाडूंचा आत्मसन्मान जाणणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. ‘आधारस्तंभ’ हे कॉफी टेबल बुक हे पवार यांचे क्रीडा क्षेत्रावरील योगदान दर्शवते, या शब्दात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचा गौरव केला.
चिंतामणी ज्ञानपीठचे अध्यक्ष माजी नगरसेवक विजय उर्फ अप्पा रेणुसे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या क्रीडा क्षेत्रातील कारकीर्दीवर आधारित क्रीडाविश्वाचा आधारस्तंभ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन गुरुवारी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर होते.
शरद पवार चालतं-बोलतं विश्वविद्यापीठ : मुंडे
शरद पवार हे चालतं बोलत विश्वविद्यापीठ आहेत. अगदी ऊसतोड मजुरापासून जागतिक साखरेच्या बाजार पेठेपर्यंत आणि सुईपासून विमानापर्यंत माहिती असणारा जगाच्या पाठीवर दूरदृष्टी असलेला नेता नाही. त्यामुळेच या 82 वर्षाच्या खेळाडूसोबत कुठलाही खेळात नाद करत नाही. राजकारणात होत्याचं नव्हतं करण्याची त्यांच्यात धमक आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
माझ्या जीवनावर खेळाचा पगडा : रेणुसे
माझ्या जीवनावर खेळाचा पगडा आहे. कुस्तीच्या लाल मातीमुळे माझ्या आयुष्याला भरपूर काही दिले. पवार साहेबांचे क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान आहे. क्रीडा क्षेत्रावर त्यांचे फार प्रेम आहे. खेळाडूंच्या पाठीवर आश्वासक हात त्यांनी कायम दिला. त्यांचे हे योगदान समाजासमोर यावे यातून कॉफी टेबल बुकची संकल्पना पुढे आली. फक्त अभ्यासाने नव्हे तर क्रीडा क्षेत्रातून करिअर घडू शकते यासाठी हे बुक मार्गदर्शक ठरेल, असे अप्पा रेणुसे यांनी सांगितले.