पुणे | गेली 34 वर्षे राबविण्यात येत असलेल्या स्त्री कामगार कल्याण योजनेमार्फत गूळ, भुसार विभागातील महिला कामगारांचा स्नेहमेळावा व बोनस वाटप कार्यक्रम झाला. ‘दि पूना मर्चंटस् चेंबर’ व हमाल पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया, पोलीस उपायुक्त सुषमा चव्हाण व हमाल पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव उपस्थित होते. त्यामध्ये महिला कामगारांना प्रत्येकी 14 हजार रुपये बोनसचे वाटप चोरडिया व चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले की, आपआपला व्यवसाय करत असताना आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या ओळखून ‘दि पूना मर्चंटस् चेंबर’तर्फे महिला कामगारांसाठी हा उपक्रम केला जातो. चेंबरचे हे कार्य कौतुकास्पद आहे. पोलीस उपायुक्त चव्हाण यांनी या उपक्रमाचे भरभरुन कौतुक केले. कष्टकरी महिलांप्रती उपक्रम राबविणारी एकमेव संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. ‘दि पूना मर्चंटस् चेंबर’ने कोरोनाच्या काळामध्ये घरी न थांबता पुणेकर जनतेला अविरत धान्याचा पुरवठा केला, त्याबद्दल पोलीस दलातर्फे मी त्यांचे अभिनंदन करते, असेही त्या म्हणाल्या.
डॉ. बाबा आढाव यांनी ‘दि पूना मर्चंटस् चेंबर’च्या उपक्रमाचे मनापासून अभिनंदन केले. व्यापारी, चेंबर व कामगाराचे सलोख्याचे संबंध आणखी दृढ व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. महिला कामगारांविषयी कळकळीने काम करणारी ‘दि पूना मर्चंटस् चेंबर’ व हमाल पंचायत ही एकमेव संस्था असल्याचे सांगून महिला व हमाल कामगार याच्यांसाठी अधिक काही करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
स्त्री कामगार कल्याण योजना समितीचे अध्यक्ष नवीन गोयल यांनी म्हटले की, ‘दि पूना मर्चंट्स चेंबर’ आणि हमाल पंचायतीच्या वतीने घाऊक बाजारपेठेतील महिलांसाठी 1988 पासून राबविण्यात येत असलेल्या स्त्री कामगार कल्याण योजनेंतर्गत बाजारपेठेत काम करणाऱ्या सुमारे 90 महिला कामगारांना दिवाळी बोनस देण्यात आला आहे.
चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी चेंबरच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, चेंबर व हमाल पंचायतच्या सहकार्याने महिला कामगारांच्या कल्याणासाठी ही योजना शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय गेली 34 वर्षे अखंडितपणे सुरु आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, स्त्री कामगार कल्याण योजनेचे अध्यक्ष नवीन गोयल, चेंबरचे सचिव रायकुमार नहार, सहसचिव ईश्वर नहार, माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले, जवाहरलाल बोथरा, नितीन नहार, आशिष दुगड, श्याम लढा, हरीराम चौधरी, स्त्री कामगार कल्याण योजना समितीचे सदस्य मुकेश छाजेड, मुकेश गोयल, मुकेश शहा, हमाल पंचायतचे सचिव गोरख मेंगडे, खजिनदार चंद्रकांत मानकर आणि चेंबरचे सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत मुकेश गोयल यांनी केले तर आभार महिपालसिंह राजपुरोहिजत व सूत्रसंचालन उत्तम बाठिया यांनी केले.