मुंबई | सर्वसामान्यांवर महागाईचे सावट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात दूध, खाद्यतेल यांसारख्या वस्तूंचे दर वाढलेले पाहायला मिळत असताना आता भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. भाज्यांचे दर आवाक्याबाहेर पोहोचले आहेत. भाजीपाल्यांच्या किंमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्याच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. ह्या दरांची वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट आणखी कोलमडणार आहे.
मागील आठवड्यापूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. काढणीला आलेल्या भाज्या पूर्णपणे खराब झाल्या. शेतीची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. त्यामुळे भाज्यांचे दर देखील कडाडले आहेत. भाज्यांची आवक 25 ते 30 टक्क्यांनी घटल्याचं चित्र आहे. परिणामी, भाजीपालाच्या दरात 20 ते 25 टक्क्यांची वाढ बघायला मिळते आहे. बाजारात भाजीपाल्यांची आवक सुरळीत व्हायला साधारण एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत सर्वसामान्यांना भाजीपाला चढत्या दराने घ्यावा लागणार आहे.
दरम्यान, आजचे दर गवार – 100 रुपये प्रति किलो, फुलकोबी – 60 रुपये प्रति किलो, पालक – 60 रुपये प्रति किलो, शेपू – 50 रुपये प्रति किलो ,बीट – 60 रुपये प्रति किलो, कोथिंबीर – 40 रुपये गड्डी, कांदा पात – 20 रुपये गड्डी असे आहेत.