- इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचा नारायण महाराज यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव
- लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित हिंदुस्थानातील पहिल्या शिवचरित्र सामुदायिक पारायणाचा आज समारोप
पुणे | लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आलेल्या हिंदुस्थानातील पाहिल्या शिवचरित्र सामुदायिक पारायाणाचा आज (सोमवार, 31 ऑक्टोबर) समारोप होत आहे. यानिमित्त प्रसिद्ध शिव व्याख्याते प्रा नितीन बानगुडे पाटील यांचे शिवचरित्रावर व्याख्यान होणार आहे. तर, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचा इतिहासातील संशोधनाच्या कार्यासाठी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
लोकसेवा प्रतिष्ठान संचलित फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत आज (31 ऑक्टोबर) सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. नारायणपूरचे नारायण महाराज यांची या समारोप कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असून त्यांच्या हस्ते पांडुरंग बलकवडे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची माहिती आजच्या पिढीला व्हावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे या शिवचरित्र सामुदायिक पारायाणाचे आयोजन 27 ऑक्टोबर रोजी केले होते. त्याचा समारोप आज होत आहे.
या शिवचरित्र सामुदायिक पारायाणात छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, दुर्गनीती, आरमारनीती, अर्थानिती समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाराजांचे कार्य, त्यांचा दैदिप्यमान इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न यामध्यामातून झाला.