फुलगाव | नूतन विद्यालय वडकी येथे झालेल्या 19 वर्षाखालील तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी करत अंतिम स्पर्धेत विजयाला गवसणी घातली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व नूतन विद्यालय वडकी येथे आयोजित हवेली तालुका शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा 2022-23 नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या संघाने अंतिम सामन्यात बी. जे. एस. वाघोली या संघावर एक डाव राखून विजय संपादन केला. आता या संघाची निवड नूतन विद्यालय, वडकी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
सामना जिंकल्यानंतर लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. या दैदिप्यमान कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना क्रीडा विभागप्रमुख तानाजी पाटील व प्रशिक्षक विलास सावंत यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. तर लोकसेवा प्रतिष्ठानचे अर्जुन शिंदे, विकास तिरखुंडे यांचे विशेष मार्गदर्शन संघाला मिळाले.
यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक व लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य नरहरी पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी महाविद्यालयाचे प्राचार्य अमर क्षीरसागर, टेन टी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य शोपिमोन, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य डेनसिंग आदींनी विजयी संघाचे अभिनंदन केले. लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.