पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी दिले आहे.
रुपाली पाटील ठोंबरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होत्या. पुणे महापालिकेत त्या नगरसेवक होत्या. पक्षांतर्गत कुरघोडींमुळे नाराज झालेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी डिसेंबर २०२१ मध्ये मनसेला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईमध्ये अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाला होता. रुपाली पाटील ठोंबरे यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावरूनच त्यांना चांगली जबाबदारी मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर पक्षाकडून पुणे शहरात करण्यात आलेल्या आंदोलनांमध्ये त्या नेहमी अग्रेसर दिसल्या. विरोधी पक्षांच्या भूमिकांवर अभ्यासपूर्वक आणि आक्रमकपणे भूमिका मांडताना रुपाली पाटील ठोंबरे दिसत आल्या आहेत. माध्यमांमध्ये त्यांनी पक्षाची भूमिका अत्यंत जोरकसपणे मांडली आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत पक्षनेतृत्त्वाकडून त्यांच्याकडे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची भूमिका दिली आहे. यापुढील काळात महिलांसंदर्भातील प्रश्न व समस्यांबाबत याचपद्धतीने पक्षाच्या ध्येय धोरणानुसार भूमिका मांडावी अशी अपेक्षा देखील पत्रात व्यक्त केली आहे.