पिंपरी | विमानाचे आकर्षण काय असते हे गडचिरोलीत पाहिले. माडिया जमातीतील विद्यार्थ्यांना भारत दर्शनासाठी नेण्यात आले होते. मात्र, भारत दर्शनापेक्षा त्यांना विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये बसणे हे अधिक महत्वाचे वाटले. त्यांच्या चेहर्यावरील आनंदाने सर्वांचे बालपण जागृत केले. आज एरोमॉडेलिंगचे प्रात्यक्षिके पाहताना बालपण जागृत झाले, असे भावनिक उद्गार पिंपरी-चिंचवड पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी काढले.
‘यूथ ऑर्गनायझेशन फॉर ज्वाईनिंग अॅक्शन अँड नॉलेज (योजक)’ आणि ‘बजाज ऑटो सीएसआर’च्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या स्टेम लर्निंग सेंटरच्या लाईफ कौशल्याशी निगडित ‘एरोमॉडेलिंग शो’चे आयोजन पिंपरी येथील एच. ए. मैदानावर करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेखर सिंह बोलत होते.
अध्यक्षस्थानी बजाज सीएसआरच्या वरिष्ठ मॅनेजर भूपाली म्हस्कर होत्या. यावेळी पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त अण्णा बोदडे, उपायुक्त संदीप खोत, पीसीएमसीचे आयटी व सीएसआर प्रमुख निलकंठ पोमण, फोर्ब्स मार्शलच्या सीएसआर प्रमुख बिना जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तसेच योजकचे संस्थापक अतुल इनामदार, संचालिका रेणू इनामदार, दत्ता पवार, माजिद खान, रेश्मा आंधळे व विजय वावरे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विचारांचे नवीन पंख देण्यासाठी आयोजित या शोमध्ये विमान मॉडेल्सच्या उड्डाणाचे रोमांचक प्रात्यक्षिक होते. यावेळी पीसीएमच्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी या शोचा आनंद लुटला.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘मनपातर्फे एज्युकेशनल कार्निवलचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी याचा शेवट एरोमॉडेलिंग शोद्वारे करण्यात येईल. ‘तंत्रशिक्षणाचा ध्यास, करी जीवन विकास’ हा देण्यात आलेला संदेश विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी खूप मोठा आहे’.
अतुल इनामदार म्हणाले, ‘एरोमॉडेलिंग शो हा कल्पनांना भरारी देणारा आहे. संस्थेच्या माध्यमातून पीसीएमसी भागातील वस्त्यांमधील लर्निंग सेंटरमध्ये मुलांना तांत्रिक उपकरणे हाताळता येणार आहेत. शासन, सीएसआर व झपाटलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्मार्ट पिढी घडविण्याच्या दृष्टीने आमचे कार्य सुरू आहे. आज संस्थेमध्ये शंभरपेक्षा अधिक कार्यकर्ते काम करीत आहेत.’
भूपाली म्हस्कर म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांना विमानांचे आकर्षण आहे. शोच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांच्या कल्पनांना आकार देणे, त्यांची विज्ञान व तंत्रज्ञानातील रूची वाढविण्याचा प्रयत्न आहे. यासाठी बजाजतर्फे सर्व प्रकारची मदत करण्यात येत आहे.’
रेणू इनामदार म्हणाल्या, ‘योजक स्वयंसेवी संस्था जिल्ह्यातील आदिवासी आणि झोपडपट्टीतील असुरक्षित समुदायांना शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञानाबद्दल सक्षम बनविण्याचे कार्य करत आहे. आज पीसीएमसी व बजाजच्या सीएसआरतर्फे देण्यात आलेल्या आर्थिक मदतीने १२ वस्ती पातळीवरील लर्निंग सेंटरमध्ये आठवी ते दहावीच्या १५०० विद्यार्थ्यांना रोज २ तास विज्ञान व गणिताचे शिक्षण दिले जाते. तसेच आठवड्यातून एकदा तंत्रज्ञानाचे धडे दिले जात आहेत.’
बिना जोशी म्हणाल्या, ‘योजकने सुरू केलेल्या प्रकल्पाने उंच भरारी घेतली आहेच पण त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक समस्यांना टक्कर देण्याची प्रेरणा जागृत केली आहे. येथील शो पाहून आज खर्या अर्थाने बाल दिवस साजरा करीत आहोत.’
यावेळी विद्यार्थी निलेश पांडे यांनीही आपली भावना व्यक्त केली. स्मिता रोकडे यांनी सूत्रसंचालन केले.
१५ विमाने, ७ फायटर विमानांचे प्रात्यक्षिक
पिंपरी येथील एच. ए. मैदानावर सातार्याहून विशेष एरोमॉडेलिंगचा शो दाखविण्यासाठी आलेले सदानंद काळे व अर्थव काळे यांनी विद्यार्थ्यांना जवळपास १५ विमाने व ७ फायटर विमानांचे प्रात्यक्षिक दाखविले. येथे फ्लाईंग गरूड, ग्लायडर, इंडियन एअर फोर्सचे मीग २१, मीग २९, सुखोई, तेजस, जग्वार विमान आणि ट्रेनर प्लेनसारख्या विमानांचे प्रात्यक्षिक दाखविले. यापुढे जाऊन लर्निंग सेंटरमध्ये किमान मॉडेल जोडणी कार्यशाळेचे आयोजन संस्थेकडून करण्यात येणार आहे.