- शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय; महादेव जानकर यांनी दिली माहिती
टाकळी हाजी | राज्य सरकारने धनगर समाजातील मुलाच्या शिक्षणासाठी विभागनिहाय वस्तीगृहासह अदिवासी विभागाच्या धर्तीवर १२ योजनांना मंजुरी दिल्याचा आदेश काढला असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे.
महादेव जानकर म्हणाले की, धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे ही समाजाची मुख्य मागणी आहे. मात्र या मागणीला काही कारणाने उशीर होत असल्याने समाजाची प्रगती होण्यासाठी एसटी च्या सवलती लागू करण्याची मागणी तत्कालिन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीसाठी भाजप-सेना सरकारमध्ये आपण मंत्री असताना धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणासह आदिवासी समाजाप्रमाने सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून योजनांचा प्रस्ताव सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण तयार केला होता. परंतु राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्याने त्यांनी या प्रस्तावाचा शासन आदेश काढला नाही. राज्यात नव्याने शिंदे-फडणवीस सरकार आल्याने त्यांच्याकडे योजनांच्या अंमल बजावणीची मागणी केली आणि त्यांनी तत्काळ आदेश देत शासन निर्णय काढला. त्यासाठी त्यांचे आभार जानकर यांनी मानले.
सरकारने खालील बारा योजनांचा शासन आदेश काढला असून सर्वानी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे महादेव जानकर यांनी केले आहे.
मंजूर करण्यात आलेल्या 12 योजना पुढील प्रमाने –
१) भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील दहावीनंतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे, नागपूर , अमरावती या महसूल विभागांच्या ठिकाणी वस्तीगृह निर्माण करणे.
२) वस्तीगृहापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वीत करणे.
३) गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देणे.
४) धनगर समाजाच्या बेघर कुटुंबियांना १०,००० घरकुले बांधून देणे.
५) समाजासाठी आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पीत निधी उपलब्ध नसलेल्या कार्यक्रम / योजना राबविण्यासाठी न्युक्लियस बजेट योजना राबविणे.
६) समाजातील युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मुलभूत प्रशिक्षण देणे.
७) केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेतर तर भटक्या जमाती ‘क’ या प्रवर्गातील नवउद्योजकांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करून देणे.
८) होतकरू बेरोजगार पदवीधर युवक-युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षा / निवासी प्रशिक्षण देणे.
९) समाजातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परीक्षांसाठी परीक्षा शुल्क आर्थिक सवलती लागू करणे.
१०) ७५ टक्के अनुदानावर ४ आठवडे वयाच्या सुधारीत देशी प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य देणे.
११) धनगर समाजातील भूमिहीन मेंढपाळ कुटुंबांसाठी अर्धबंदिस्त आणि बंदिस्त मेंढी पालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तथा अर्थ सहाय्य देणे.
१२) मेंढपाळ कुटुंबाना पावसाळ्यात चराई करण्याकरीता जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीसाठी अनुदान देणे.
या महत्वाच्या योजना लागू करण्यात आल्या असून त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश शासनाने संबंधीत विभागाला दिले आहेत. समाजातील तरुणांनी ही योजना तळागाळातील वंचित घटकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे.