ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन
पुणे | व्यावसायिक, सेवकवर्ग आणि ग्राहक यांच्यात अनेक ठिकाणी चांगला संवाद कमी पाहायला मिळतो. कोणत्याही व्यवसायात व्यावसायिकाप्रमाणे तेथील सेवकवर्गाची कामाप्रती सचोटी व उत्तम संवाद असणे गरजेचे आहे. ग्राहक पेठेने हे नाते तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून गेली ३० वर्षे जपले आहे. याप्रमाणे सर्वच ठिकाणी व्यावसायिक, सेवकवर्ग आणि ग्राहक यांच्यातील नाते व संवाद चांगला व्हायला हवा, असे मत ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांनी व्यक्त केले.
ग्राहक पेठच्या वतीने खजिना विहिर चौक येथे आयोजित ३० व्या तांदूळ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ग्राहक पेठच्या उपाध्यक्षा संध्या भिडे, कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, जयराज अॅन्ड कंपनीचे राजेश शहा आदी यावेळी उपस्थित होते. बासमती, आंबेमोहोर, दुबराजपासून इंद्रायणीपर्यंत तब्बल ६० प्रकारचे तांदूळ महोत्सवात पाहायला मिळत आहेत. उद्घाटनप्रसंगी तांदूळ महोत्सवातील पहिल्या ग्राहकाचा देखील सन्मान करण्यात आला.
राजेश शहा म्हणाले, संपूर्ण देशभरातून १०० ते १२० प्रकारचे तांदूळ महाराष्ट्रात येतात. मागील ३० वर्षात तांदळाच्या गुणवत्तेमध्ये फरक झाला आहे. आज ब्राऊन राईसचे महत्व वाढत चालले आहे. त्यामुळे तांदूळ महोत्सवात यंदा ६० प्रकारचे विविध तांदूळ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
सूर्यकांत पाठक म्हणाले, महोत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांचे व प्रामुख्याने महिलांचे एकत्रिकरण होत आहे. एकाच ठिकाणच्या ग्राहकांनी एकावेळेस एकत्रितपणे १५० किलोपेक्षा अधिक तांदूळ खरेदी केल्यास त्यांना शहरात विनामूल्य घरपोच सेवा दिली जाणार आहे. महोत्सवात उत्तमप्रतीचा तांदूळ थेट महाराष्ट्राबाहेरील राज्यांसह नाशिक, मावळ, भोरहून पुणेकरांसाठी उपलब्ध दिला जात आहे. याशिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला तांदूळ देखील महोत्सवात अत्यल्प दरात उपलब्ध आहे. तरी ग्राहकांनी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.