राज्यातील सत्ता संघर्षाबाबत याघडीची सगळ्यात मोठी बातमी. शिवसेनेच्या मागणीनंतर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय खंडपीठानं दिला आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी घटनापीठासमोर होणार आहे. तसेच, आजच्या सुनावणी वेळी पक्षाच्या चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोग घेणार, असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. पण गुरुवारपर्यंत निर्णय न घेण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला आता आता घटनापीठापुढे होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी सातत्यानं पुढं ढकलली जात होती. वारंवार तारीख पुढे जात असल्यानं शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण कोर्टात मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं प्रकरण पटलावर घेण्यास मान्यता दिली. सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा, न्या. हिमा कोहली, न्या. कृष्णमुरारी यांच्याच पीठासमोर ही सुनावणी पार पडली.
यापूर्वी 3 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. तेव्हापासूनच सातत्यानं हे प्रकरण पुढे ढकललं जात होतं. शिवसेनेसाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे त्यांनी आज हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या वतीनं तातडीनं मेन्शन करण्यात आलं. दुपारी याप्रकरणावर सुनावणी पार पडली.
महाराष्ट्रात नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं असलं, तरी सत्तापेच मात्र कायम आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत ‘तारीख पे तारीख’चं सत्र सुरु झालं आणि जूनपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या सलग तीन तारखा लांबणीवर गेल्या. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. जाणून घेऊया सत्तासंघर्षात आतापर्यंत नेमकं काय-काय घडलं?