पुणे | अखिल राजस्थानी समाज संघाचे अध्यक्ष ओमसिंह भाटी यांनी केंद्रीय संसदीय कार्य आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी पुणे ते जोधपूर रेल्वे दररोज सुरु करण्याची आवश्यकता का आहे हे मंत्री महोदयांना सांगितले. त्यावेळी मेघवाल यांनी भाटी यांना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पुणे ते जोधपूर रेल्वे दररोज सुरु करण्यासंदर्भात निवेदन देऊन ही रेल्वे दररोज सुरु होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
पुणे ते जोधपूर आणि जोधपूर ते पुणे ही रेल्वे आठवड्यातून एकदाच धावते. ही रेल्वे सातही दिवस सुरु करावी, या मागणीसाठी नुकतेच अखिल राजस्थानी समाज संघाच्या वतीने पुण्यात रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर ओमसिंह भाटी यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. या भेटीबाबत ते म्हणाले, मंत्रिमहोदयांनी आमची मागणी ऐकली. त्यांनी याविषयी रेल्वेमंत्र्यांशी बोलण्याचे आश्वासन दिले असून रेल्वेमंत्र्यांना हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती करणार असल्याचे मेघवाल यांनी सांगितले.
तसेच मंत्र्यांनी आमचे म्हणणे ऐकून त्यावर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने आम्हाला आनंद झाला. पी. पी. चौधरी यांनी मंत्री महोदयांची भेट घेण्यासाठी वेळ घेतली होती. त्यामुळेच आमची त्यांच्याशी भेट झाली, असे अखिल राजस्थानी समाज संघाचे अध्यक्ष ओमसिंह भाटी यांनी सांगितले.