मुंबई : पावसाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार एकमेकांना भिडल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचीही माहिती आहे. या सगळ्या राड्याविषयी आमदार अमोल मिटकरी यांनी आपली बाजू मांडत महेश शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
‘महाविकास आघाडीची काल बैठक झाली होती. या बैठकीत ठरलं होतं की, सध्या शेतकरी अडचणीत असल्याने सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज सकाळी साडेदहा वाजता आंदोलन करण्यात यावं. या आंदोलनासाठी आम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जमलो होतो. आंदोलन शांतपणे सुरू होतं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार महेश शिंदे यांनी आम्हाला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आणि आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्याचाही प्रयत्न केला,’ असा आरोप अमोल मिटकरी यांच्याकडून करण्यात आला आहे.