पुणे | आज सकाळपासून ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. दुपारनंतर मात्र पावसाने जोर धरला आहे. पुणे शहराच्या विविध ठिकाणी पावसाने एन्ट्री केली असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने आज पावसाचा अंदाज देखील वर्तवला होता. शहराच्या प्रमुख रस्त्यांवर पावसाचं पाणी साचल्यामुळे वाहनधारकांनी साचलेल्या पाण्यातून वाट काढत प्रवास करणं पसंत केलं.
गेल्या तीन दिवसांपासून पुण्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. आज पावसानं हजेरी लावल्यानं छत्री, रेनकोटशिवाय बाहेर पडलेल्या नागरिकांची मात्र धांदल उडाली.
भारतीय हवामन विभागाच्या पुणे विभागाच्या अधिकारी स्मिता आपटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज वाऱ्याची चक्रीय स्थिती दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर असल्यानं द्रोणीय स्थिती ईशान्य मध्य प्रदेश ते मध्य नैऋत्य बिहार पर्यंत आहे. त्यामुळं पावसानं हजेरी लावली आहे. २४ ते २५ सप्टेंबर रोजी मान्सून सक्रीय ते अतिसक्रीय राहील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, २६ तारखेनंतर अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्यानं मान्सून महाराष्ट्रात आणखी सक्रीय होण्याची शक्यता आहे. २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पडू शकतो. तर, २७ तारखेला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात आज नागपूर, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.