पुणे | दिव्यांची रोषणाई, भक्तिमय वातावरणातील आरती, फटाक्यांची आतषबाजी आणि प्रसन्न वातावरणात सादर झालेल्या मराठी-हिंदी गाण्यांच्या मैफलीने माँ आशापुरा माता मंदिरात आजची दिवाळी पहाट सप्तसुरात व सप्तरंगात रंगली.
माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट आणि लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 यांच्या वतीने गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा माता मंदिर येथे दिवाळी निमित्त दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष आणि लायन्स इंटरनॅशनल प्रांत 3234 डी2 चे प्रांतपाल लायन विजय भंडारी, चेतन भंडारी, भारती भंडारी, लीना भंडारी, प्रांत 3234 डी2 चे सीईओ लायन श्याम खंडेलवाल, सचिव लायन अशोक मिस्त्री, खजिनदार राजेंद्र गोयल, लायन द्वारका जालान, लायन मंगेश कटारिया, लायन महेंद्र गदिया आदी मान्यवर उपस्थित होते.
गायक राजेश दातार, डॉ माधुरी कश्यप आणि सहकाऱ्यांनी दिवाळी पहाट निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. प्रथम तुला वंदितो…, माझे माहेर पंढरी…,कानडा राजा पंढरीचा…,ऐ मेरी जोहरा जबी…अशा भक्तीगीत व गाण्यांनी दिवाळी पहाटची आजची मैफल चांगलीच रंगली.
तत्पूर्वी, माँ आशापुरा माता मंदिरात आलेल्या भाविकांनी दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला. त्यानंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्यासाठी लकी ड्रॉ काढून भाविकांना त्याचा मान मिळाला. यावेळी फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी करण्यात आली. आलेल्या भाविक रसिकांनी एकमेकांना दिवाळीच्या स्नेहपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आनंद व समाधानची दिवाळी पहाट!
“दिवाळी हा आपला सर्वांत मोठा सण. खरं तर उत्सवच… लहान-थोर, गरीब-श्रीमंत ही दरी मिटवणारा आणि सर्व कुटुंबात आनंद व समाधानाची उधळण करणारा हा दिवाळी सण आहे. दिवाळीच्या निमित्ताने माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट तर्फे माँ आशापुरा माता मंदिरात दिवाळी पहाट हा सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचा सर्व मित्र परिवार, स्नेही एकत्र येतात. मंदिरात दीपोत्सव साजरा होतो. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. देवीची सामूहिक आरती होते. आणि एकमेकांच्या भेटीगाठी होतात. यातून निर्भेळ असा आनंद आणि समाधान मिळते.”
- विजय भंडारी
अध्यक्ष, माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट
प्रांतपाल, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2