पुणे | प्रेमानं, आपुलकीनं आणि अत्यंत प्रामाणिकपणे नोकरी करणारा पीएमपीएमएलचा एखादा वाहक अर्थात कंडक्टर असेल असं जर तुम्हाला सांगितलं तर, कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही परंतु हे खरं आहे आणि त्यांना याचं सर्टिफिकेट चक्क प्रवाशांनीच दिलं आहे.
आजवर आपण बऱ्याचदा पीएमपीएमएलच्या बसनं प्रवास केला आहे. बहुतांशवेळा आपल्या सर्वांची या बसबद्दल, बसच्या चालक व वाहकाबद्दल अर्थात ड्रायव्हर व कंडक्टरबद्दल कायम तक्रार असते परंतु पीएमपीएमएल बसचे कंडक्टर म्हणून गेली १६ वर्षे नोकरी करणाऱ्या तुषार सस्ते यांच्याबद्दल प्रवाशांच्या भन्नाट प्रतिक्रिया ऐकल्या तर तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल.
कंडक्टर तुषार सस्ते यांच्या घरी जाऊन एका डॉक्टरांनी कौतुकानं पुस्तक भेट दिलं… तेव्हा आपल्या मुलाच्या कामाचं होत असलेलं हे कौतुक बघून तुषार यांच्या मातोश्रींना आनंदाश्रू अनावर झाले होते.
तुषार सस्तेंची प्रवाशांसोबत असलेली स्नेहपूर्ण आणि प्रेमळ वागणूक ही वेगळी आणि मोलाची वाटली. त्यांचं सर्व प्रवाशांसोबत असलेलं नम्र वागणं, मदतगार वागणं कौतुकास्पद वाटलं अशी भावना लेखक डॉ. सदानंद बोरसे यांनी व्यक्त केली.
त्याचबरोबर तुषार सस्ते यांना श्रीयोग कोकरे या प्राचार्यांनी भावनिक पत्र लिहलं. त्यांनीही बोलताना आजपर्यंत भावलेला वाहक म्हणजे तुषार सस्ते आहे. तसेच प्रत्येकाला आपुलकीने बोलणं प्रत्येकाला ताई, दादा, माऊली बोलणं यासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नसते ते आपसूकच येणं गरजेच असतं आणि ते यांच्यात पाहिलं अशा विविध प्रवाशांनी तुषार सस्ते यांचं कौतुक केलं आहे.
आपल्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून आई-वडिलांची खूप इच्छा असते परंतु, मिळालेली नोकरी ते कशी करतात याविषयी फारसं कधी बोललं जात नाही. तुषार सस्ते मात्र, त्यांची नोकरी अशी इमाने इतबारे करीत असल्यानं त्यांचं झालेलं कौतुक पाहून त्यांच्या आईचा ऊर मात्र दररोज अभिमानानं भरून येतो. त्यांच्या आईला देखील आपल्या मुलाचं होत असलेलं कौतुक पाहून आनंदाश्रू अनावर झाले होते.
पीएमपीएमएल बस चे वाहक तुषार सस्ते यांच्याबद्दल समजल्यानंतर इतर असे का नाहीत… असा प्रश्न आपल्याला पडतो. सर्वच क्षेत्रातील सर्वांनीच अशी सेवा दिली तर, किती अमुलाग्र बदल आपल्या व्यवस्थेमध्ये होऊ शकतो याची कल्पना आपण करू शकता.