मुंबई | योगगुरु रामदेव बाबा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ठाण्यात शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी ही भेट झाली. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मानस, आध्यात्मिक आणि राजकीय वारसदार असल्याच्या भावना रामदेव बाबांनी भेटीनंतर व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला योगगुरु रामदेव बाबा आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास दाखल झाले. ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यावर दोघांची भेट झाली. विशेष म्हणजे रामदेव बाबांनी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ रामदेव बाबांनी शिंदेंचीही भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
रामदेव बाबा म्हणाले,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे आमच्या हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरुष आहेत. राजधर्मासोबतच सनातन धर्म, ऋषी धर्माला प्रामाणिकपणे ते निभावत आहेत. त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो होतो. कारण बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत आमचं आत्मीय प्रेम होतं. शिंदे हे बाळासाहेबांचे मानस, आध्यात्मिक आणि राजकीय वारसदार आहेत. आम्ही त्यांच्यासोबत मोठ्या विषयांवर संवाद साधला. खूप बरं वाटलं, अशी प्रतिक्रिया रामदेव बाबा यांनी एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर व्यक्त केली.