पुणे | स्वयंघोषित धर्मगुरू असुमल हरपलानी उर्फ आसाराम बापू हा बलात्कार प्रकरणी आमरण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्याच्या अटकेला ३० ऑगस्टला ९ वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत जामीन, पॅरोल न मिळाल्याने तो मिळावा, फास्ट ट्रॅक कोर्ट मधून तातडीने न्याय मिळावा या मागणीसाठी श्री योग वेदांत सेवा समिती ( पुणे ) साधक मंडळीतर्फे पुण्यात मंगळवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे आणि लगतच्या जिल्हयातून आलेले सुमारे ५ हजार आसाराम भक्त या मूक मोर्चात सहभागी झाले होते.
काळया फिती बांधून शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर सकाळी साडेअकरा वाजता मूक मोर्चाला प्रारंभ झाला. साधकांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. सर्वांनी सफेद कपडे परिधान करून दंडाला काळया फिती लावल्या होत्या आणि हातात भगवे ध्वज घेतले होते. ‘बापूजी को रिहा करो’, ‘संत न होते तो जल मरता संसार’, ‘नही सहेंगे अत्याचार, झूठे आरोपोंका हो बहिष्कार’ अशा अनेक प्रकारच्या घोषणांचे फलक साधकांनी हाती घेतले होते. न्यायालयीन प्रक्रिया संथ गतीने चालत असून न्याय मिळण्यात विलंब होत आहे, याची शासन, समाज आणि न्यायालयाने दखल घ्यावी, असे समितीच्या निवेदनात म्हटले आहे. शनीवारवाडा, लाल महाल,फडके हौद, दारूवाला पूल, १५ ऑगस्ट चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालून राष्ट्रपतींसाठीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आसाराम सध्या जेलची हवा खात आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये आसाराम याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करणारं शाहजहांपूर मधील पीडित कुटुंब घटनेपूर्वी आसाराम यांच भक्त होतं. ७ ऑगस्ट २०१३ ला पीडितेच्या वडिलांना छिंदवाडा इथल्या गुरुकुलमधून फोन आला. तुमची मुलगी आजारी पडली आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा पीडितेचे आई-वडील छिंदवाडा इथल्या गुरुकुलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की, तुमच्या मुलीला भूतबाधा झाली आहे. ज्याला आसाराम घालवू करू शकतात. १४ ऑगस्टला पीडितेचं कुटुंब आसाराम यांना भेटण्यासाठी त्यांच्या जोधपूर इथल्या आश्रमात पोहोचलं. १५ ऑगस्टला संध्याकाळी १६ वर्षीय पीडितेला ‘बरं’ करण्याच्या बहाण्यानं आपल्या खोलीत बोलवून तिच्यावर आसाराम यांनी बलात्कार केला. असा उल्लेख या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे करण्यात आला आहे.