पुणे | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा शैक्षणिक संकुल येथे पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनवण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आपली जीवन पद्धती आणि उत्सवदेखील पर्यावरणपूरक असण्याची आज आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती आणि इतर पर्यावरणपूरक सजावटीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत 100 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी पर्यावरणपूरक शाडू मातीपासून आकर्षक व सुबक मूर्त्या बनवल्या. लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा राबविण्यात आली.
युवा स्पंदनचे चेतन धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी करन सुर्यवंशी, युवराज कुलकर्णी, अक्षय तिवारी, संजना डावरे, तिषा खोलम या कलाकारांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. लोकसेवा गर्ल्स मिलिटरी स्कूलच्या प्राचार्या लक्ष्मी कुलकर्णी, प्रशासन अधिकारी अर्जुन शिंदे, राजेंद्र भोसले यांनी कार्यशाळेचे संयोजन केले.