पुणे | हॉकीमध्ये भारताची जगभर ओळख निर्माण करणारे हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. लोकसेवा संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव येथे शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील विविध क्रीडा प्रकारांत विजयी झालेल्या संघांना व खेळाडूंना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं. नाशिक जिल्हा क्रीडा संचालक देविदास जाधव या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जनक टेकाळे, कबड्डी क्षेत्रातील राजेंद्र पायगुडे, ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. श्रीराम आंबड, पुणे जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त राजेंद्र काळभोर, उत्कृष्ठ क्रीडा संघटक पुरस्कार प्राप्त मच्छिंद्र ओव्हाळ, मनोज स्वामी, केतन जाधव, ओंकार पायगुडे, कापसे, रोहिदास भाडले हे मान्यवर उपस्थित होते.
लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक व लोकसेवा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नरहरी पाटील, प्रशासन अधिकारी अर्जुन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर, टेन टी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य शोफेमॉन, लोकसेवा इंग्लिश स्कूलचे प्राचार्य डेनसिंग, लोकसेवा गर्ल्स मिलिटरी स्कूलच्या प्राचार्या लक्ष्मी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत पवार यांनी केले. याप्रसंगी लोकसेवा शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.