पुणे | पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मिरवणूकीवरून नवा वाद निर्माण झाला आहे.मानाच्या पाच गणेश मंडळांच्या आधी ज्या मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जन मिरवणूक काढायची आहे त्यांना पोलिसांनी परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी याचिका ‘बढाई समाज ट्रस्ट’ कडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामध्ये पुणे पोलिस आयुक्तांसह मानाच्या पाचही गणेश मंडळांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत मानाची पाच गणेश मंडळे मार्गस्थ झाल्यानंतरच इतर मंडळांनी जावे, अशी परंपरा आणि प्रथा आजही पाळली जाते. मात्र असा कोणताही कायदा नाही. मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणुक जाण्यापूर्वी इतर लहान गणेश मंडळांनी लक्ष्मी रस्त्याच्या वापरावरील बंधने बेकायदा आहेत. त्यामुळे राज्यघटनेतील कलम १९ नुसार मिळालेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन होत आहे,’ असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालयात याविषयी याचिका दाखल केली असून याचिकेत पुणे पोलिस आयुक्तांसह श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ, गुरुजी तालीम गणपती मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ आणि केसरीवाडा गणपती मंडळाला प्रतिवादी करण्यात आले आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. असीम सरोदे, अॅड. अजिंक्य उडाणे, अॅड. अजित देशपांडे, अॅड. तृणाल टोणपे आणि अॅड. अक्षय देसाई यांनी दिली.लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकांमध्ये पोलिसांकडून मानाच्या मंडळांनाच प्राधान्य दिले जाते. याबाबत दरवर्षी विनंती करूनही पोलिस ऐकून घेत नाहीत. मानाच्या पाच गणेश मंडळांकडून अन्य मंडळांना तुच्छतेची वागणूक दिली जाते, असे याचिकेत म्हटले आहे.