मुंबई | राज्यासह देशभरात गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले आहेत. काल रात्री उशिरा त्यांचं मुंबईत आगमन झालंय. आज दिवसभर त्यांचे मुंबईत विविध कार्यक्रम आहेत. अमित शाह आज मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाकरिता जाणार आहे. तत्पूर्वी ते लालबागच्या राजाची चरणीही लीन होणार आहेत. गेल्या ४० मिनिटांपासून सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तिथून ते लागबागकडे जायला रवाना झाले. दुसरीकडे त्याच सुमारास शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांची आज न्यायालयीन कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यासाठी तुरुंगाबाहेर आणण्यात आलं. त्यावेळी ते माध्यमांच्या कॅमेरात कैद झाले. अमित शाह यांचा मुंबई दौरा आणि संजय राऊत यांच्या जेलबाहेरील फोटोंची सध्या चर्चा सगळीकडे रंगते आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले आहेत. लालबागचा राजाच्या दर्शनाने शाहांचा दौरा सुरु होणार आहे. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शाहांनी चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्री लालबागचा राजाच्या दर्शनाला येत असल्यामुळे परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.