पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कालच अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या गणेशोत्सव दौऱ्यावर टीका केली होती. अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना ‘शो मॅन’ म्हणत त्यांना चिमटा काढला होता. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. “दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’ सारखा हा ‘शो’ले आहे, एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा. आणि हो हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या ‘ट्रेलर’नेच धडकी भरली ? पिक्चर अभी बाकी है’!”, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले होते. यावरुन आता रुपाली पाटील-ठोंबरे यांनी श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले आहे. त्या सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
‘आपण बोलू नका, थोडी सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवून टीका करा. आपण कोणावर टीका करतो याचं भान ठेवावं अन्यथा महाराष्ट्रात हाहाकार माजेल. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत. तेव्हा अजितदादांवर बोलताना थोड आचपेच ठेवून बोला.” अजितदादांवर बोलण्यासाठी तुमच्या पप्पांना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगा. बच्चू ये तेरे बस की बात नाही, असे म्हणत रुपाली पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यामुळे आता या टीकेला श्रीकांत शिंदे यांच्याकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.