मुंबई | महाराष्ट्रात उभा राहणारा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे वळल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पदरी निराशा आली आहे. वेदंता फॉक्सकॉन प्रकल्पावरुन महाविकास आघाडी आणि शिंदे फडणवीस सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ९९% महाराष्ट्रात आलेला प्रकल्प खोके सरकारमुळे गेल्याचा आरोप केला. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारला सवाल केला आहे.या फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून विरोधी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. राजकीय दबावापोटी गुजरात गेलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थिक उन्नतीसाठी, युवकांना, रोजगारासाठी आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सेमीकंडक्टर व डिस्प्ले फॅब्रीकेशनचा प्रकल्प महत्त्वाचा आहे असे सांगितले आहे. अजित पवार यांनी वेदंता फॉक्सकॉन प्रकल्प राज्य सरकारने लागेल ते करावे पण परंतू ही गुंतवणूक जाऊ देऊ नये असे आवाहन पत्राद्वारे केले आहे.
पत्रामध्ये अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे की, वेदांता ग्रुपचा सेमीकंडक्टर व डास्पले फॅब्रीकेशनचा तळेगांव येथे येणारा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरात येथे नेल्याचे कळते. वेदांता व तैवान येथील फॉक्सकॉन या कंपनीच ६०:४० असे जॉइन्ट व्हेंचर झाले आहे. सर्वसाधारणपणे २ लाख कोटींची गुंतवणूक व अंदाजे १.५ लाख रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प उभारणीसाठी या कंपनीने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलगांणा व आंध्र प्रदेश या राज्याबरोबर चर्चा केली.
तसेच विरोधीपक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना गुतंवणूकधारकांनी निवडलेल्या गुजरातमधील घोलेरा पेक्षा तळेगावच्या तुलनेत काहींच नसल्याचे पत्रात सांगितले आहे.
जागा निवडीसाठी एकुण १०० मुद्दांचा विचार करुन त्यांनी तळेगांव टप्पा ४ ही जागा अंतिम केली. त्यासाठी तळेगांव येथील त्यांना आवश्यक असणारे इकोसिस्टिम, अंटोमोबाईल व इलेक्ट्रोक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, JNPT शी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्याने त्यांनी तळेगांव येथील १००० एकर जागेची निवड केली होती. वेदांताच्या वरीष्ठ टीमने सर्व बाबींचा विचार करून तळेगांव हेच ठिकाण योग्य असल्याचे सुचविले आहे. उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने त्यांना बन्याच सवलती देण्याचे मान्य केल्याचे कळते. मात्र वरीष्ठ राजकीय दबावापोटी ही गुंतवणूक गुजरात येथे गेल्याचे कळते. हा प्रकल्प गुजरातमधील घोलेरा येथे प्रस्तावित आहे. या ठिकाणी तळेगांवच्या तुलनेत काहीच नाही. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अजित पवारांनी जनतेची भूमिका मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे की,
गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सांमजस्य करार (MOU) करणार आहेत, असे कळते. अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी राज्य सरकारने लागेल ते करावे पंरतू ही गुंतवणूक जाऊ देऊ नये, यामुळे महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. कारण यामधून मोठया प्रमाणावर GST मिळणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात यावे, ही विनंती.