मुंबई | वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर हा दोन लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राकडून निसटून गुजरातकडे गेला याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत खुलासा आलेला नाही, असा आरोप युवासेनेचा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊ याबाबत त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला जाब विचारला आहे.यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला याची माहिती आपल्या सर्वांना कळाली. पण अजूनही यावर या सरकारकडून कुठलाच खुलासा आलेला नाही. १ लाख रोजगार उपलब्ध करुन देणारा प्रोजेक्ट असा दुसऱ्या राज्यात का गेला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्रात यायला तयार होता.
यावरून राजकारण्यांमध्ये आरोप-प्रत्योरोप सुरु झाले आहेत. यापेक्षा मोठा प्रोजेक्ट आणू असेही आश्वासन देण्यात येत आहे. यावर ठळकपणे उत्तर मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती, पण व्हॉट्सॲपवरुन याबाबत खोटी माहिती पसरवली जात आहे, असा आरोपही यावेळी आदित्य ठाकरेंनी केला.
२०२५-१६ मधील मॅग्नेटिक महाराष्ट्राचा एमओयू होता फॉक्सकॉनचा त्यानंतर फॉक्सकॉन आणि वेदांतासोबतचा वेगळा एमओयू या दोघांची सांगड घालून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम व्हॉट्सअॅपवर सुरु आहे. २०१५ मधला करार हा आयफोनच्या असेम्ब्लीसाठीचा होता, याचं पुढे काय झालं हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. तसेच आत्ताचा जो करार होता तो सेमिकंडक्टर्स चीप्सबाबतचा होता. यासाठी केंद्रानं ७६ हजार कोटींची सबसिडी मंजूर केली होती. त्याचअनुषंगानं आम्ही २१ जानेवारी २०२२ रोजी अनिल अग्रवाल यांच्यासोबत चर्चा करुन त्याचा पाठपुरावा केला, असंही यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितलं.प्रकल्पाचा विषय मागे का पडला? दाओसमध्ये मी, सुभाष देसाई, नितीन राऊत आम्ही होतो तेव्हा आमच्या शिष्टमंडळाकडं त्यांच्याशी कराराचे कागदपत्रे तयार होती. यामध्ये केंद्र आणि राज्याची सबसिडी मिळून वेदांत आणि फॉक्सकॉनची गुंतवणूक करणं गरजेचं होतं. त्यानंतर फॉक्सकॉनच्या तैवानच्या लोकांसोबत आमची भेट झाली. त्यानंतर ४० गद्दारांनी आमचं सरकार पाडलं, म्हणून तो विषय मागे राहिला.