कोल्हापूर I महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेली करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी हिची महिमा अगाध आहे. संपुर्ण भक्तगण देवीला अंबाबाई या नावाने पुजतात. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी पहिले व पुर्ण शक्तीपीठ आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरामध्ये अंबाबाईचे मंदिर स्थित आहे. स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेल्या या हेमाडपंथीय मंदिराचे निर्माण इ.स.६३४ साली चालुक्य राजवटीतील राजा कर्णदेव यानी केलं आहे.
अतिशय लोभस रूप असलेली श्री महालक्ष्मीची हि मूर्ती पश्चिमाभिमुख असून ही मुर्ती किमती व उच्च प्रतीच्या काळ्या रंगाच्या पाषाणापासून बनवलेली आहे. मूर्तीचे वजन हे ४० किलो असून उंची १.२२ मीटर आहे. ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आली आहे. ही मूर्ती बनविताना त्यामध्ये हीरक नावाचा धातू मिसळलेला आहे. यामुळे मूर्तीवर प्रकाशाचे किरणे पडले असता ती उजळून निघते. मूर्तीमागे दगडी सिंह आहे ज्यामुळे देवीला जगदंबेचे रूप मानले जाते. डोक्यावर सोनेरी मुकुट आहे आणि देवीच्या मस्तकावर नागांनी आपला फणा काढला आहे.आई अंबाबाईच्या एका हातात ढाल तर दुसऱ्या हातात गदा आहे. तिसऱ्या हातात पानपात्र व चौथ्या हातात म्हाळुंग फळ आहे.
श्री महालक्ष्मीने हिरव्या व लाल रंगाचे पातळ नेसलेले असून ललाटावर कुंक तसेच नाकात नाथ व गळ्यात अलंकार घातलेले आहे. पुरातन काळातही देवीचा उल्लेख आढळतो. अकराव्या शतकातील शिलालेखात ’लिंगशैषाघौषहारिणी’ असा देवीचा उल्लेख आहे. कोल्हापूर मंदिरात एकूण चार शिलालेख आढळतात जे देवनागरी लिपीत कोरलेले आहेत.
देवीचे हे मंदिर पर्यटकांचे आकर्षण आहे. महालक्ष्मीचे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार देखील पश्चिमेकडे आहे. मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. हे देवालय आकाराने एखाद्या फुलासारखे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला सभामंडप प्रवेश केल्यावर सुंदर दिसतो. देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी,कृष्ण, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. महालक्ष्मी मंदिर हे त्रिकुट प्रसाद मानले गेले असून इथे महाकाली, अंबाबाई, महासरस्वती अशा तीन देवींचे मंदिरे एकाच ठिकाणी जोडली गेल्याचे आढळते. येथील मंदिराचा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असल्याचे स्पष्ट होते ते देवीच्या किरणोत्सवाच्या वेळी. यामध्ये वर्षातून दोन वेळा मूर्तीवर प्रकाशाचे किरणे पडते व मुर्ती विलक्षण उजळून निघते. जानेवारीच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्यात देवीच्या चरणांपासून माथ्यापर्यंत सुर्याची किरणे स्पर्श करतात. सलग तीन दिवस हा सोहळा अनुभवला जातो. जगभरातून हा सोहळा पाहण्यासाठी अभियंते येत असतात.
कोल्हपुरच्या देवीला करवीर निवासिनी महालक्ष्मी असं म्हंटलं जातं. त्याची एक आख्यायिका आहे ती म्हणजे अशी की राक्षस केशीचा मुलगा कोल्हासूरच्या जुलमाने त्रस्त होऊन देवतांनी देवीला आचना केली. त्यामुळे श्री महालक्ष्मीने दुर्गेचे रूप धारण केले आणि ब्रह्माहत्यारांनी त्याचा वध केला. कोल्हासूरच्या तोंडातून निघणारा दिव्य प्रकाश थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरला आणि देवीच्या देहाचं कोल्हयात रूपांतर झालं. अश्विन पंचमीला या राक्षसाचा वध करण्यात आला. मरण्याच्या आधी या राक्षसाने एक वरदान मागितलं की या भागाच नाव कोल्हासूर व करवीर असेच राहिले पाहिजे. पण आता कोल्हासूर वरून ते कोल्हापूर झालं, पण करवीर हे नाव आजपर्यंत तसंच राहिल आहे.
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी परब्रम्ह यांनी जे रूप साकार करून शक्ती प्रकट केली ती शक्ती म्हणजे श्री महालक्ष्मी. राजा दक्ष यांनी पेटवलेल्या अग्निकुंडात कन्या सती ने दिलेल्या आहुती मुळे भगवान शंकर सतीचा देह खांद्यावर घेऊन संपूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरत होते. तेव्हा भगवान विष्णू यांनी आपले सुदर्शन चक्र वापरून सती यांच्या देहाचे जे भाग केले ते भाग पृथ्वीवर १०८ ठिकाणी पडले. ह्या मध्ये डोळे ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी लक्ष्मी प्रकट झाली. करवीर म्हणजे कोल्हापूरची लक्ष्मी देवीचे हे स्थान पवित्र मानले जाते. त्याची तुलना दक्षिण मधील काशी म्हणून केली जाते.
अशी महिमा असलेली कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे.