तुळजापूर I महाराष्ट्राचे कुलदैवत असणारी तुळजापूरची भवानी आई साऱ्यांची तारणहारिणी आहे. भक्तांगणांची आराध्य दैवत असलेली तुळजापूरची भवानी देवी ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी दुसरी व पुर्ण शक्तीपीठ आहे. तुळजापूर तालुक्यात बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर भवानी मातेचे मंदीर वसलेले आहे. तुळजापूरची भवानी देवी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळाची कुलदेवता आहे.
तुळजाभवानी देवीच्या मंदिराची रचना अतिशय वैशिष्ठ्यपूर्ण आहे. प्रथमदर्शनी मंदिराची रचना एखाद्या किल्ल्या सारखी दिसते. मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पाय-या उतरल्यानंतर महाद्वार लागते. त्यावरील काही शिल्प हेमाडपंथीय असून तिथे नारद मुनींचे दर्शन होते. मंदिर हे पूर्वाभिमुख असून आत गर्भगृह आणि सोळखांबी मंडप बांधलेला आहे. तुळजा भवानी मातेच्या मंदिरात प्रवेश करताना आवारात अनेक लहान मंदिर आहेत. ज्यामध्ये कल्लोळतीर्थ, गोरखतीर्थ, गोमुख तीर्थ, गणेश तीर्थ, विठ्ठल, दत्तात्रय, सिद्धिविनायक अशी मंदिरे आहेत. आत गाभा-यात गेल्यानंतर मध्यभागी चांदीच्या सिंहासनावर गंडकी शिळेची अष्टभुजा असलेली भवानीमातेची मूर्ती महिषासुरमर्दिनीच्या रूपात आहे.
मातेच्या मस्तकावर सयोनी शिवलिंग असून, हातात त्रिशूल, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र अशी शस्त्रे आहेत. तर देवीने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहे, तर दूस-या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशुल खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर व डाव्या बाजुला सिंह आणि पूराण सांगणारी मार्कंडेय ऋषींची मूर्ती दिसते. मातेच्या पाठीवर बाणांचा भाता आहे तर डावा पाय जमीनीवर टेकलेला आणि उजवा पाय हा महिषासुराच्या शरीरावर ठेवलेला आहे. देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सुर्य कोरलेला दिसतो.
आई तुळजाभवानी कृतयुगात देखील भक्तांच्या मदतीला धावून आली होती, त्याची आख्यायिका अशी आहे की, कृतयुगात कर्दम ऋषींचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी अनुभूती हिने पती बरोबर सहगमन करण्याचं ठरविलं. परंतु तिला अल्पवयीन मुलगा असल्याने इतर ऋषीमुनींनी तिची समजूत घातली व त्या अल्पवयीन मुलासाठी तिने तो निर्णय मागे घेतला. मंदाकिनी नदीच्या तटावर ती तपश्चर्या करू लागली. त्यावेळी कुकर नावाच्या दैत्याने तिच्या तापाचा भंग केला. त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन तिच्या पतिव्रत्येचा भंग करण्याचा प्रयत्न दैत्याने केला. अनुभूतीने सकट समयी श्री भगवतीचा धावा केला व श्री भगवतीने भवानी मातेचा अवतार धारण करून त्या दुष्ट दैत्याचा वध केला व अनुभूतीच्या विनंतीवरून यमुनाचल म्हणजेच बाला घाट पर्वतावर आई भवानीने अखंड वास्तव केले. तुळजापूरची भवानी आई कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात धर्मराजासाठी व कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूपाने धावून आली अशी भक्तांची समजूत आहे. त्यामुळे ही आई भवानी देवी भक्ततारिणी व कुलस्वामिनी म्हणून जगविख्यात आहे.