नांदेड | महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी तिसरे व पुर्ण शक्तीपीठ म्हणजे माहूरची रेणुकामाता. माहूरची रेणुकामाता हे एक महाराष्ट्रातील महान तीर्थक्षेत्र मानलं जातं. अनेकांची कुलदैवत असलेली रेणुकामाता नांदेड जिल्ह्यातील माहुर तेथील माहुरगडावर निसर्गाच्या सानिध्यात स्थित आहे. या माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.
देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे मानले जाते. रेणुकामातेचे मंदिर आकाराने कमळासारखे आहे आणि वास्तूशास्त्राचा संपुर्ण अभ्यास करून मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराला दक्षिणमुखी दरवाजा असून गाभाऱ्यामध्ये रेणुकामाता आहे. गाभाऱ्याचे प्रवेश द्वार चांदीच्या पत्राचे आहे.
सभामंडपाच्या परिसरात महाकाली, महालक्ष्मी आणि तुळजाभवानीच्या मुर्ती आहेत. परशुरामांचे देऊळ, दर्शनी भागास गणपतीचे देऊळ, विष्णू कवी मठ, पांडवतीर्थ, औदुंबर झरा, जमदग्नी स्थान, अमृत कुंड, आत्मबोध तीर्थ, मातृ तीर्थ आणि राम तीर्थ इत्यादी तीर्थ आवारामध्ये आहेत.

गाभाऱ्यामध्ये रेणुकामातेची हासरी व मनमोहक मुर्ती आहे. यामध्ये फक्त देवीचा मुखवटा आहे. देवीच्या मुखवट्याची उंची तब्बल 5 फुट आहे आणि रुंदी 4 फुट एवढी आहे. देवीचा हा मुखवटा पूर्वाभिमुख असून डोक्यावर चांदीचा टोप घातलेला आहे. सुवर्णेभूषणे परिधान करून देवी पितांबर नेसलेली आहे. भाळी मळवट भरलेले असून मुखात तांबूल घेतलेले आहे.

देवीचे फक्त मुख गाभाऱ्यात असल्याने अनेकजण आश्चर्य व्यक्त करतात. फक्त मुखवटा असल्याची सुद्धा एक आख्यायिका आहे. रेणुकामाता परशुरामांची आई होती. मात्र तरीही खुद्द परशुरामांनी रेणुका मातेचा वध केला होता.आणि त्याचे कारण होते त्यांच्याच वडिलांनी दिलेला आदेश. नंतर परशुरामांना आपल्या मातेची सारखी आठवण येऊ लागली. स्वतः आईची हत्या केल्याने ते अतिशय दुखी व शोकाकुल झाले होते. त्याच क्षणी त्यांना एक आकाशवाणी ऐकू आली. तुझी आई तुला भेटू शकते तू मागे वळून बघू नकोस. परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती की न राहवता त्यांनी मागे वळून बघितले. तोपर्यंत फक्त रेणुकेमातेचा चेहराच जमिनीतून वर आलेला होता. परशुरामांना तेवढेच दिसले. त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळारूपातील मुखाचीच पूजा केली जाते. या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराची ‘मातापूर ‘ अशी ओळख निर्माण झाली. शेजारीच आंध्रप्रदेशातील ‘ऊर’ गाव असल्यामुळे ‘माऊर’ आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाते.

माहूरगडावर रेणुका मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्र अतिशय उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. भक्तगण भक्ती भावाने देवीला पुजतात. तिची आराधना करतात.