वणी | देवी सप्तश्रृंगीचा महिमा सर्वश्रुत आहे.नाशिकमधील
सप्तश्रृंगी देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य व अर्धपीठ म्हणून ओळखलं जातं. सप्तश्रृंगी देवीचं वास्तव्य नाशिक पासून 65 किलोमीटर अंतरावर आणि 4800 फूट उंचीवर आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गडावर सप्तश्रृंगी देवी उभी आहे.
श्री सप्तश्रृंगी देवी नावं घेतलं तर शेंदुरी रक्तवर्णीय देवी,
डोक्यावर मुकूट, कानात कर्णफुले, नाकात नथ,गळ्यात मंगळसुत्र, पुतळ्यांचे गाठले, कमरेला कमरपट्टा, पायात तोडे असे क्षृगांरयुक्त सौंदर्य डोळ्यासमोर येते.
गेल्या काही दिवसांत सप्तश्रृंगी देवीच्या लोभस रूपाच्या खुप चर्चा होत आहेत आणि त्यांचे कारण आहे की तब्बल १००० वर्षांपासून लावलेला शेदुंर शास्त्रीय पद्धतीने काढण्यात आला आहे. या प्रक्रियेमुळे सर्व भक्तांना देवीचे मुळ स्वरूप अनेक शतकांनंतर पाहता आले आहे. आई सप्तश्रृंगी देवीचे हे सौंदर्य पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काचं बसला. अतिशय सुबक व देखणे रूप देवीचे आता बघायला मिळत आहे.
सप्तश्रृंगी गडावर आल्यावर उजवीकडे देवीच्या मंदिराकडे जाण्याचे प्रवेशव्दार आहे. येथून ५४८ पायर्या वर गेल्यावर डोंगराच्या कपारीत महिरपीत देवीची मूर्ती आहे ज्याची उंची आठ फुट आहे. तिला अठरा भुजा आहेत. देवीचे डोळे तेजस्वी तर सर्व हात एकमेकांना लागलेले आहेत. महिषासुराशी लढण्यासाठी देवीला सर्व देवांनी शस्त्रे दिलेली असे. श्री भगवतीला १८ हात असल्याने तिला ‘अष्टादश देवी’ असेही म्हणतात. प्रत्येक हातामध्ये तीन आयुध धारण केलेली आहेत. श्री सप्तश्रृंगी देवीचा उल्लेख त्रिगुणात्मक स्वरूपात आद्य स्वयंभू शक्तपीठ म्हणून पौराणिक ग्रंथातून आढळतो.
सप्तश्रृगींचे देवीची आख्यायिका अशी आहे की, महिषासुर मर्दन करण्यासाठी देवतांनी देवीची याचना केली त्यामुळे देवी होमातून प्रकट झाली. तिचे हे रूप म्हणजे सप्तश्रृगींचे होते. हिला ब्रह्मस्वरूपिणी देखील म्हणतात. ब्रह्मदेवाच्या कमंडळापासून निघालेल्या गिरीजा महानदीचे रूप तसेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे देवी सप्तश्रृंगी.
पूर्वी गडावर १०८ कुंड असल्याचा उल्लेख केला जातो त्यापैकी आता फक्त दहा ते पंधरा अस्तित्वात आहेत. देवीच्या मागील बाजूस उत्तरेकडे तांबूलतीर्थ आहे. या कुंडातील पाण्याचा रंग तांबडा आहे. देवीनं पानाचा विडा खाऊन या बाजूला टाकला त्यामुळे पाणी लालसर झालं आणि काजलतीर्थ या कुंडात देवीनं काजळ घातलेले डोळे धुतले म्हणून हे पाणी काळसर रंगाचं आहे अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.