कार्ला | महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील वेहेरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही सर्व भक्तांसाठी एक आदिशक्ती आहे. रेणुका मातेचा अवतार असलेली एकवीरा देवी हे एक जागृत देवस्थान म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे.परिसरातील लोक देवीला वेहेरगावची यमाई,अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असे ही म्हणतात.
पुणे-मुंबई या दोन महानगरांच्या मध्यभागी विपुल निसर्गसंपदाने नटलेल्या मावळ तालुक्यात कार्ला लेणी व श्री एकवीरा मातेचे मंदिर आहे. पुण्याहून मुंबईला जाताना उजव्या हाताला सहा किलोमीटर अंतरावर व लोणावळ्यापासून १२ किलोमीटर अंतरावर वेहरगाव-कार्ला गाव आहे. कार्ला गडावर एकवीरा देवीचे स्थान आहे. गडावर जाण्यासाठी अनेक पायऱ्या आहेत. श्री एकवीरा मातेचे मंदिर कार्ला लेणी परिसरात आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना आई एकवीरा देवी मंदिराजवळ पाहायला मिळतो. प्राचीन लेण्यांमध्ये या लेण्यांचा क्रमांक अग्रस्थानी लागतो. ही बौद्धकालीन लेणी आहे. मात्र या लेणी व मंदिराच्या निर्मितीबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही.
अतिशय प्राचीन असलेले हे मंदीर पूर्वी हेमाडपंथीय होते. मंदिर-संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधलेली मूळची तीन मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती. यापैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णतः सुस्थितीत असून इतर बांधकामे केवळ नकाशावरच अस्तित्वात आहे. नंतर मात्र देवी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केला.देवीच्या मंदिरात प्रवेश करताना अखंड दगडात कोरून काढलेले दोन भव्य हत्ती स्वागतास उभे दिसतात. या मंदिराच्या परिसरात भरपूर पाण्याची सोय व्हावी यासाठी पायविहीर बांधली असून मंदीर परिसरात दोन दीपस्तंभही उभारले आहेत. त्यावर नगारखाना आहे.
मंदिराच्या परिसरात प्राचीन शमीवृक्ष असून वृक्षाखालीच शमीदेवतेचे भारतातील एकमेव मंदिर आहे. विजयादशमीच्या दिवशी भाविक येथे दर्शन घेऊन सिमोल्लंघन करत असतात. या परिसरातच परशुरामाचेही मंदीर आहे. विस्तीर्ण पसरलेल्या मंदिराच्या परिसरात महालक्ष्मी, विठ्ठल-रुक्मीणी, शितला माता, हनुमान आणि काळभैरव यांचे देखील मंदीर आहे. तसेच चार खोल्यांची धर्मशाळाही आहे. मंदिरामध्ये पशुबळी देण्याचा रिवाज आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची सुंदर व मनमोहक मूर्ती आहे. ही मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. चेहऱ्यावर विलक्षण तेज व हासरी मूर्ती असल्याने आई एकवीराचे दर्शन झाल्यावर मन प्रसन्न होते. महाराष्ट्रभरातून आई एकवीराचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येत असतात. प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाची आई एकवीरा कुलस्वामिनी असल्याने ह्या समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात. नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीरा आईची ख्याती आहे. आई एकवीरेचे नाव एकवीरा का आहे? या मागे देखील कहानी आहे. आपल्या पराक्रमाने तिन्ही लोकी नावलौकीक मिळविलेल्या परशूराम या वीरपुत्राची जननी म्हणून आदिशक्ती एकवीरा देवी ओळखली जाते. जमदग्नी ऋषींची पत्नी असलेल्या रेणुका मातेचा परशुराम हा एकमेव वीर पुत्र असल्याने या देवीस ‘एक वीरा’ असे संबोधले गेले आणि तेच नाव पुढे एकवीरा म्हणून रूढ झाले.
श्री आई एकवीरा मंदिराच्या निर्माणाबाबत एक दंतकथा आहे. पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकवीरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की, पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनीही हे मंदिर एका रात्री बांधून दाखविले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही, असा वरही एकवीरा देवीने पांडवांना दिला.
पांडवांच्या काळापासून प्रसिद्ध असलेली श्री आई एकवीरा भक्तांच्या संकटांना दूर करून त्यांची मनोकामना पूर्ण करणारी, नवसाला पावणारी, स्वयंभू अशी ही देवी असल्याची भाविकांची श्रध्दा आहे.