मुंबई | शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना (Shivsena) हे नाव वापरण्यावरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच शनिवारी रात्री निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याबाबतचा निर्णय दिला. त्यावरून आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक आयोगाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत रिट याचिका दाखल केली आहे.
उद्धव ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेत म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही. प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने याचिकेत केली.
‘याचिका आजच सुनावणीसाठी घ्यावी’
उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत त्यांनी आपली बाजू या याचिकेच्या माध्यमातून मांडली आहे. यामध्ये त्यांनी ही याचिका आजच तातडीने सुनावणीसाठी घ्यावी, अशी मागणीही केली आहे. आता उच्च न्यायालय यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.