मुंबई | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला नवं नाव आणि नवं निवडणूक चिन्ह मिळाले आहे. सोमवारी ठाकरे गटाला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह मिळाले. तर आज शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे’, असे ते म्हणाले.
ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाने पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळण्यासाठी पर्याय दिले होते. त्यानंतर आता शिंदे गटाला नवे चिन्ह मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे म्हणाले, ‘केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. आम्ही प्राधान्य तळपता सूर्य चिन्हाला दिलं होतं. परंतु त्यांनी आम्हाला ते चिन्ह दिलं नाही. आम्हाला ढाल-तलवार त्यांनी दिली आहे आणि त्यांचा निकाल आम्हाला मान्य आहे’.
तसेच ढाल-तलवार ही शिवसेनेची जुनीच निशाणी आहे. आपली बाळासाहेबांची शिवसेना आहे. ही मराठमोळी निशाणी आहे. त्यामुळे आता परफेक्ट काम झालेलं आहे. ढाल-तलवार ही छत्रपती शिवरायांची आणि त्यांच्या मावळ्यांची निशाणी आहे, त्यामुळे ती अगोदच सर्वत्र पोहचलेली आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.