मुंबई | राज्यातील राजकारणात विविध महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. शिवसेना पक्षातील फूट ही बाब मुख्य विषय बनत आहे. शिंदे गटाला भाजपकडून पाठिंबा असल्याचे अनेकदा आरोप केला जात आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी वक्तव्य केले आहे. ‘भाजप जास्त वेळ सत्तेविना राहू शकत नाही. त्यामुळे पडेल ती किंमत देऊन त्यांनी शिवसेना फोडली आहे, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील वाद अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गटाने दावा केला होता. त्यानुसार अनेक प्रयत्नही करण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने यावर निर्णय दिला आहे. या सर्व राजकीय घडामोडीनंतर जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘शिवसेनेमधील बंडाळी ही शिवसेनेची नसून, भारतीय जनता पक्ष प्रणीत होती. भाजप जास्त वेळ सत्तेविना राहू शकत नाही. त्यामुळे पडेल ती किंमत देऊन त्यांनी शिवसेना फोडली आहे’.
दरम्यान, जयंत पाटील यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटावर बोलताना थेट भाजपवर खळबळजनक आरोप केल्याने भाजप आता यावर काय प्रत्युत्तर देणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.