मुंबई | भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वात सरकार सत्तेत आले. त्यानुसार भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्रिही झाले. या सरकारला नुकतेच शंभर दिवस पूर्ण झाले असताना आता त्यांच्यातील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निधी वाटपाचा निर्णयच रद्द करण्यात आल्याने वादाची पहिली ठिणगी पडल्याचे म्हटले जात आहे.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या 40 आमदारांच्या मतदारसंघासाठी एक हजार कोटींच्या निधीची घोषणा केली होती. यातील 82 कोटींची कामे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील होती. हे लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याकडून ही कामे रद्द करण्यात आली. त्याचा जीआरही काढला. फडणवीस-महाजन यांच्या या निर्णयानंतर शिंदे गटाच्या सर्व आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
दरम्यान, काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून टीका केली आहे. ‘गद्दारांनी आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची सवयच करुन घेतली पाहिजे. कारण भाजपला गद्दारांची गरज उरलेली नाही आणि खोकेनाथाचं भाजपसमोर काही चालत नाही’, असे काँग्रेसने म्हटले आहे.