मुंबई | ‘मुंबईत शिवसेनेचा एकही खासदार येणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. रमेश लटके (Ramesh Latke) असते तर आज ते शिंदे गटात असते’, असे केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सांगितले.’आधी मातोश्री सोड तर, मैदानात ये. मातोश्री सोडत नाही. बाहेर पडत नाही. वीस पावले चालत नाही’, अशा शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. राणे यांनी ठाकरे पिता-पुत्रावर टीका करत विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘जी भाषा माननीय पंतप्रधान आणि माननीय अमित शहा यांच्याबद्दल वापरली त्यांना माझ्याकडून मदत कधीच मिळणार नाही. मी कडवट आहे. असतो तिथे असतो. उद्धव ठाकरेंच्या हिंमत असेल तर मैदानात या विधानावर राणे म्हणाले, आधी मातोश्री सोड तर, मैदानात ये. मातोश्री सोडत नाही. बाहेर पडत नाही. वीस पावले चालत नाही. एकवीस पाऊल टाकायचं नाही. हा कसली हिंमत काढतोय. शिवसेना आहे कुठं?, अशा सवाल केला.
दरम्यान, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, या उद्धव ठाकरेंच्या विधानावर ते म्हणाले, ‘सरकार पाडून दाखवा. आम्ही सरकार पाडलं. मैदानात या पण आता मैदानातच आहे. दरवाजा उघडून बाहेर तर बघ जग कसंय, मैदानं कशी असतात. रस्ता कसा असतो, हे उद्धव ठाकरेने पाहावे. उगीच बडबड करू नये.
आदित्य ठाकरेंचा शेंबड्या उल्लेख
आदित्य ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर राणे म्हणाले, ‘त्याच्याबाबत काही प्रश्न विचारू नका. नाहीतर आत्ताच थांबवतो. कसला आदित्य. शेंबड्या मुलाचा प्रश्न मला विचारताय’, असे म्हणत अधिक बोलणं टाळले.