मुंबई | अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेल्या मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी भाजपने पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याचे ते म्हणाले.
पोटनिवडणुकीसाठी दाखल अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असताना भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर आता मिटकरी यांच्याकडून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले. ते म्हणाले, ‘भाजपला पराभव कळून चुकला असल्याने अंधेरी पोटनिवणुकीतून माघार घेणे हाच पर्याय उरला आहे . जर निवडणूक लढवलीच तर 20 हजारच्या मताधिक्याने दारुण पराभव स्वीकारून आगामी मुंबई मनपा सुद्धा गमवावी लागेल हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे स्वतःची अब्रू वाचवणे हाच पर्याय शिल्लक असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.
दरम्यान, अर्ज मागे घेण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली होती. त्यानंतर अखेर भाजपने आपला उमेदवार लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध झाली आहे.