मुंबई | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपच्या मुरजी पटेल (Murji Patel) यांनी माघार घेतली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘राजसाहेब ठाकरेंनी अंधेरीची निवडणूक एकहाती जिंकली’, असे म्हटले आहे. त्यामुळे आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निवडणूक लढवू नये, असे विनंती करणारे पत्र रविवारी लिहिले होते. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा करून उमेदवारी मागे घेण्यात आली. याच निर्णयावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्याचे श्रेय सर्वस्वी राज ठाकरे यांचे असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नेत्यांकडून केला जात आहे.
दरम्यान, भाजपने ही निवडणूक लढवू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी वक्तव्ये केली होती. अखेर मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि आता ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.