बुलडाणा | शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट वेगळे झाले. शिंदे गटाने पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला होता. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ‘निवडणूक आयोगाने हा आदेश काही काळापुरता दिला आहे. नंतर आपलं नाव आणि चिन्ह वगैरे परत मिळणारच आहे’.
शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर शिंदे गटाने दावा केला होता. शिंदे गटाने शिवसेनेतील 12 खासदार, 40 आमदार फोडले. त्यानंतर शिवसेना दोन भागांत विभागली गेली. निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंना मशाल हे नवं निवडणूक चिन्ह दिले गेले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘धनुष्यबाण गोठवलं तरी हातातील मशाल घेऊन तुम्ही पुढे जात आहात. प्रत्येक चिन्हाचं एक महत्त्व असतं. रामाने धनुष्यबाणानेच रावणाला मारलं होतं. तर अन्याय जाळणारी आणि अंधारात वाट दाखवणारी मशाल असते. निवडणूक आयोगानं काही काळापुरता हा आदेश दिला आहे.नंतर आपलं नाव आणि चिन्ह वगैरे परत मिळणारच आहे’.
शिवसेना संपवण्यासाठी सगळं केलं गेलं
‘माझ्या पक्षाचं नाव गोठवलंत, माझं चिन्ह गोठवलंत. एवढं करूनही उमेदवार देऊन नंतर पळ काढलात. मग एवढं सगळं कशाला केलं? फक्त आपल्याला मनस्ताप द्यायचा, आपल्याला छळायचं आणि शिवसेना संपवायची यासाठी हे सगळं केलं गेलं, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.