पुणे | गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर सातत्याने टीका केली जात आहे. त्यातच राष्ट्रवादी फोडण्याचा डाव भाजपकडून सुरु असल्याची चर्चा असताना आता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विधान केले आहे. ‘भाजप संपूर्ण देशातून प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे काम करत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी त्यांना दहा जन्म घ्यावे लागतील तरी राष्ट्रवादी काँग्रेस फुटत नाही’, असे वक्तव्य त्यांनी केले.
पुण्यात धनजंय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे-फडणवीस सरकारवर बोलताना ते म्हणाले, ‘जनतेच्या हितासाठी हे सरकार सत्तेत आलेले नाही. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, असेही नव्हते. हे सरकार स्वत:च्या स्वार्थासाठी आलेले आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे नुकसान दिसत नाही. मंत्र्यांनी प्रवास करावा की नको हेही दिसत नाही. विरोधी पक्षाकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागणी होत असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक राजकारण म्हणून दुर्लक्ष केले जात आहे. हे महाराष्ट्राला त्याच्या राजकीय संस्कृतीला परवडणारे नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात एवढं पीकांचे नुकसान झालं आहे. त्यामध्ये कुठलेच मंत्री दिसत नाहीत. शिधा भेटणार नाहीच त्या नुसत्या गोड घोषणा सरकार करत आहे, असेही ते म्हणाले. तसेच बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले. पण त्यावर विचार झालेला नाही.
पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत…
मंत्रिमंडळ विस्ताराची दुसरी यादी जाहीर होणार यावर बोलताना धनजंय मुंडे म्हणाले, ‘पंकजा मुंडे यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांची पुन्हा काम करण्याची इच्छा आहे का? हे त्यांनाच विचारायला हवं. भाजप मला विचारून मंत्रिमंडळ विस्तार करत नाही, असे म्हणत अधिक बोलणं टाळले.