नाशिक | नव्याने सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त २६ ऑगस्टपासून राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्यामध्ये एसटी बसचा मोफत प्रवास योजना सुरु केली आहे. या शासनच्या आणि लालपरीमधील या प्रवासाला जेष्ठ नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
राज्यामध्ये रोज सरासरी २ लाखांहून अधिक नागरिक या ‘अमृत जेष्ठ नागरिक’ योजनेचा प्रवास करून फायदा घेत आहेत. राज्यातील ३१ विभागांतून केवळ ५२ दिवसांतच तब्बल एक कोटी चार लाख ८६ हजार ८०९ जेष्ठांनी याचा लाभ घेतला आहे.
या योजनेचा पुरेपूर फायदा घेत जेष्ठ नागरिक दिवाळीसाठी आपल्या कुटुंबासह गावी, तसेच देवदर्शन, पर्यटनासाठी विविध ठिकाणी फिरण्यास जात आहेत. दिवाळीपूर्वी जेष्ठ नागरिकांची हि लगबग पाहून प्रवाशांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विरोधक व सोशल मीडियावर ट्रोल होणारी ही योजना ज्येष्ठांनी यशस्वी करून दाखविली आहे. राज्यात एसटी महामंडळाच्या १५ हजार ५०० बस रोज शहरासह ग्रामीण भागात धावतात. २४७ आगार व ५७८ बसस्थानके आहेत. या बसमध्ये ३० विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात ३३ टक्क्यांपासून ते शंभर टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते.
राज्यातील २९ लाख प्रवासी रोज एसटी बसमधून प्रवास करतात. त्यात दोन लाख ७५ वर्षांवरील ज्येष्ठांचा समावेश आहे. एसटी बस ही ज्येष्ठ नागरिक, शाळेतील मुले व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवास करण्याचे हक्काचे वाहन आहे. या योजनेमुळे ज्येष्ठांना पुणे, मुंबई, नागपूरसह मोठ्या शहरात दवाखाना व इतर कामांसाठी जाणे सोपे झाले आहे.
अमृत ज्येष्ठ नागरिक’ ही योजना ज्येष्ठांना वरदान ठरली आहे. एसटी बसच्या राज्यातील २६ ऑगस्ट ते १६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जालना, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, गडचिरोली या ३१ विभागांतून तब्बल ५२ दिवसांतच एक कोटी चार लाख ८६ हजार ८०९ ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत मोफत प्रवास केला आहे. या योजनेमुळे वृद्धांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त अशी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना जाहीर केली आहे.