बदलापूर | बदलापूर शहराजवळील कोंडेश्वर धबधब्यात बुडून चौघांचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पाण्यात उडी घेऊन या चौघांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, या धबधब्यावर पोहण्यासाठी बंदी असतानाही हे तरुण येथे पोहोचलेच कसे हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आकाश झिंगा हा तरुण घाटकोपर कामराजनगर येथील रहिवासी आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे इतर चार साथीदार कोंडेश्वर येथे फिरण्यासाठी आले होते. कोंडेश्वरच्या धबधब्यावर पोहण्यास बंदी असतानाही हे तरुण पाण्यात पोहण्यासाठी उतरले. दुपारी दीडच्या सुमारास या तरुणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडाले. त्या तरुणांना वाचवण्याचा त्याच्या इतर मित्रांनी प्रयत्न केला. पण त्याचदरम्यान घाटकोपरचे रहिवासी असलेल्या सुरज साळवे, आकाश झिंगा, लिनस उच्चपवार आणि स्वयंम मांजरेकर या चौघांचा बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, स्थानिकांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तरुणांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत या तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या चौघांचे मृतदेह बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.