पुणे | महाराष्ट्रात नियोजित असलेले अनेक प्रकल्प गुजरातला नेण्यात आले आहे. त्यामुळे आता राजकारण चांगलेच तापले आहे. त्यानंतर आता शिंदे गटाने पुण्यात ठाकरे गटाविरोधात (Thackeray Group) बॅनरबाजी सुरु केली आहे. त्यामध्ये ‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’ असा मजकूर त्यावर देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात नेल्यानंतर सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांकडून टीका केली जात आहे. या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी करण्याची एक संधीही सोडली जात नाही. त्यानंतर आता शिंदे गटाकडून पुण्यातील बालगंधर्व चौक, फर्ग्युसन रोड या भागात उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत असणारे बॅनर झळकवले आहेत.
बॅनरमध्ये ‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’ असा आशय या बॅनरमध्ये आहे. तसेच या बॅनरवर महाराष्ट्रातून किती प्रकल्प कधी आणि कुठे गेले आहेत, त्याच्या नावाची यादी प्रसिद्ध करून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.