मुंबई | शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट वेगळा झाला. त्यामध्ये शिवसेनेतील अनेक आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुवाहाटीला गेले. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केले आहे. ‘बच्चू कडू (Bachchu Kadu) माझ्या एका फोनवर आणि माझ्या शब्दावर गुवाहटीला गेले होते’, असे फडणवीस म्हणाले.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, ‘माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहटीला गेले होते. त्यांना मी स्वत: फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की, आम्हाला सरकार बनवायचं आहे. तुम्ही आम्हाला हवे आहात आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावे. माझ्या एका कॉलवर ते गुवाहाटीला गेले. त्यामुळे बच्चू कडूंनी कुणाशी सौदा केला. काही उलटसुलट केलं असा आरोप करणे चुकीचे आहे’.
दरम्यान, शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांबाबत खोके (पैसे) घेतल्याचा आरोप असो की गुवाहाटीला जाणे, या प्रकारावर भाष्य केले जात आहे. त्यानंतर आता फडणवीस यांनी गुवाहाटीच्या जाण्याबाबत विधान केले आहे.