मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) च्या कामगारांनी राज्य सरकारी सेवेत विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप केला होता. त्यावरून आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विधान केले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांना त्रास देण्यासाठीच एसटी कामगारांनी संप केल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित पक्षाच्या एका मेळाव्यात छगन भुजबळ बोलत होते. यावेळी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाणे, एसटी कर्मचाऱ्यांचे शरद पवारांच्या घरावर झालेले आंदोलन यांसह अन्य अनेक मुद्द्यांवरून छगन भुजबळ यांनी भाष्य केले. ते म्हणाले, शरद पवारांना त्रास देण्यासाठीच एसटी कामगारांचे आंदोलन करण्यात आले. तुमचे मोर्चे आता का निघत नाही, अशी विचारणा करत आता तुमचेच सरकार आले आहे. एसटीचे विलिनीकरण करून दाखवा, असे आव्हान छगन भुजबळ यांनी दिले.