मुंबई : ”आम्हाला ब्रेन हॅमरेज आला, हार्ट अटॅक आला, अपघात झाला किंवा विषबाधा झाली. या सगळ्यासाठी जबाबदार व्यक्ती धनंजय मुंडे (Dhanjay Munde) असेल. मी पोलिसांसह नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि कोर्टातही अर्ज दिला आहे. मला आणि माझ्या मुलांना काहीही झालं, तर याला सर्वस्वी धनंजय मुंडे अँड गँग जबाबदार असेल,’ असे विधान करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी केले आहे.
राज्यातील महिलांवरील अत्याचारावर करुणा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी पुन्हा एकदा लक्ष्य केले. करुणा मुंडे म्हणाल्या की, ‘मी आजपर्यंत अनेक तक्रारी केल्या आहेत. गेल्या वर्षी धनंजय मुडेंनी माझी मुले उचलून नेली होती. माझ्यावर घटस्फोटाच्या कागदपत्रांवर साईन करुन, लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे सांग, असा दबाव टाकला होता’.
तसेच मला 50 कोटींची ऑफर दिली. नंतर माझी मुले उचलून नेली. तेव्हाही मी महिला आयोगात तक्रार दिली होती, रुपाली चाकणकर यांनी काहीच कारवाई केली नाही. महाविकास आघाडी सरकारने तेव्हाही काहीच कारवाई केली नाही. ते सरकार आपल्या मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, असेही करुणा मुंडे यांनी सांगितले.